जनता सहकारी बँकेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर चार वर्षापूर्वी भागधारक पॅनेलने बँकेला तोटयातून बाहेर काढून गतवैभव प्राप्त करुन देण्याचे आश्वासन देत बँकेची सत्ता काबीज केली. गेल्या चार वर्षात संचालक मंडळाने काम करुन बँकेने सभासदांना लाभांश देत आहे याचे सर्वप्रथम श्रेय संचालक मंडळावर विश्वास दाखवणा-या सभासदांना आहे. सहकारी चळवळीपुढे मोठे आव्हाने असून जनता बँकेने व्यावसायिक दृष्टीकोन जोपासल्यास सर्व संकटांवर मात करता येणे शक्य आहे. बँकेने आता येथून पुढे यशाची कमान अशीच पुढे सुरु ठेवावी असे गौरवोद्गार सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी काढले.

जनता सहकारी बँकेच्या लाभांश वितरण आणि सभासदांचा सत्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावार खासदार श्री.छ. उदयनराजे भोसले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, भागधारक पॅनेलचे प्रमुख अॅड. मुकुंद सारडा, भास्करराव शालगर, रामचंद्र साठे, बँकेचे चेअरमन विनोद कुलकर्णी, व्हाईस चेअरमन सौ.सुजाता राजेमहाडिक आणि संचालक उपस्थित होते.

श्री.चरेगावकर पुढे म्हणाले, सहकारी संस्थेमध्ये चार प्रमुख घटक असतात त्याची सुरुवात सभासदापासून होते. सहकाराचे काम हे कंपनी कायद्याच्या उलट आहे. एखादी सहकारी संस्था अडचणीतून जात असताना सभासदांना दाखवलेला संयम, विश्वास हे महत्वाचे असते. जनता बँक अडचणीतून जात असताना सभासदांना दाखवलेला संयम आणि विश्वास कौतुकास पात्र आहे. बँकेला समाजाने पाठिंबा दिला त्यामुळेच संचालक मंडळाला आज लाभांश देणे शक्य झाले. त्यामुळे या कार्यक्रमात सगळयात जास्त कौतुक सभासदाचे आहे. एखादी संस्था अडचणीत आल्यास सभासदांना गर्भगळीत होता न होता संस्थेवर विश्वास दाखवावा. सभासदानंतर बँकेचे कर्मचारीही अभिनंदनास पात्र आहेत. जगात सहकाराची कार्यपध्दत मान्यताप्राप्त झाली आहे. राष्ट्र बलशाली करायचे असेल तर सहकार चळवळ मजबूत केली पाहिजे. मूठभर लोक श्रीमंत होऊन देश बलशाली होणार नाही तर तळागाळातील माणूस श्रीमंत, समृध्द झाला पाहिजे त्यासाठी सहकार चळवळ आवश्यक आहे. यावेळी त्यांनी सभासद आणि संचालक शब्दाचा मतितार्थ सांगितला. ते पुढे म्हणाले, आज सहकारी चळवळीबद्दल समाजात अस्थिरता आहे परंतु सहकारी संस्थांना व्यावसायिक दृष्टीकोन जोपासल्यास या संकटावर मात करणे शक्य आहे. जनता बँकेच्या संचालक मंडळावर आता येथून पुढे मोठी जबाबदारी आहे. यावेळेस 8 टक्के लाभांश दिला आहे तो आता 15 टक्के कसा देता येईल यादृष्टीने संचालक मंडळाने काम केले पाहिजे. व्यावसायिक दृष्टीकोन म्हणजे केवळ चांगल्या भौतिक सोयीसुविधा नाहीत तर प्रति कर्मचारी व्यवसाय वाढवणे, ठेवी आणि कर्जाचे व्याजदर याचे सुनियोजन त्यावर चिंतन, अभ्यास करणे, बदलत्या स्पर्धेनुसार ध्येय धोरणे बदलणे, सर्व स्तरातील लोकांना कर्जाचे वाटप कसे करता येईल याचे नियोजन करणे, कार्यक्षमता वाढवणे हे सगळे म्हणजे व्यावसायिक दृष्टीकोन. जनता बँकेने व्यावसायिक दृष्टीकोन जोपासून वाटचाल केल्यास बँकेला येणा-या सर्व संकटांवर मात करता येणे शक्य आहे. बँकेने कर्मचारी आणि सभासदांसाठी प्रशिक्षण व्यवस्था करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. बँकेस माझ्याकडून आणि शासनाकडून लागणारे सर्वतोपरी सहकार्य देऊ असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

यावेळी बोलताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, सर्वसामान्य सातारकरांची असलेली जनता बँक आता खडतर प्रवासातून बाहेर पडली आहे. जनता बँकेचा सभासद म्हणून मला अभिमान आहे. ही बँक सर्वसामान्यांनी निर्माण केली असून ती चांगल्या पध्दतीने कार्यरत रहावी. बँकेने लाभांश वाटप सुरु करणे ही एक महत्वाची पायरी चढली आहे आता मागे वळून पाहू नये. रिझवर्ह बँकेची धोरण कडक होणार असून अर्बन बँकांपुढे अडचणी निर्माण होऊ शकतात. तरीसुध्दा जनता बँकेने आता यशाची चढती कमान कायम ठेवावी. बँकेच्या या वाटचालीत कर्मचा-यांचाही मोठा वाटा आहे. चांगल्या पध्दतीने काम करुन बदलत्या काळानुसार ज्या नवीन सुविधा देण्यात येणार आहे त्या सुरु करण्यासाठी लवकर नियोजन करावे अशी अपेक्षा व्यक्त बँकेस सर्वतोपरी सहकार्य करु आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी बोलताना भागधारक पॅनेलचे प्रमुख अॅड. मुकुंद सारडा यांनीही या यशाचे संपूर्ण श्रेय सभासदांचे असल्याचे सांगितले. बँक अडचणीत असताना सभासदांनी विश्वास दाखवला. भागधारक पॅनेलला निवडून दिले त्यामुळेच आजचा हा सुदिन आला आहे. संचालक मंडळ आणि सेवकांनाही चांगल्या पध्दतीने काम केले त्यामुळे तेही अभिनंदनास पात्र आहेत. यावेळी त्यांनी  भागधारक पॅनेल स्थापनेची पाशर्वभूमी सांगत पॅनेलप्रमुख होताना मी जी तत्वे सांगितली होती ती संचालक मंडळाने पाळली. ही बँक तोटयातून बाहेर काढून लाभांश वाटप हे काम शिवधनुष्य पेलण्यासारखेच होते. या संचालक मंडळाने हे शिवधनुष्य उचलले आणि ताकदीने पेललेही. या संचालक मंडळाने नुसता इतिहास सांगितला नाही तर तो घडवलाही. आता येथून पुढे त्यांच्यावर खरी जबाबदारी असून पुढील दहा वर्षे तुम्हाला वाढता लाभांश देता आला पाहिजे. त्या पध्दतीने संचालक मंडळाने काम करावे. गेल्या चार वर्षात सभासद वाढणारी ही जिल्हयातील एकमेव बँके असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर महर्षी धोंडो कर्वे यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आला. बँकेच्यावतीने मान्यवरांचे स्वागत झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे चेअरमन विनोद कुलकर्णी यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, जनता  बँकेची वाटचाल दमदार सुरु होती परंतु एन.पी.ए.चे. कडक नियम लागू झाल्यानंतर बँकेचे वाटचाल खडतर झाली. 2004 साली बँकेला 3 कोटी 64 लाखाचा तोटा झाला. चांगल्या विचाराचं, नवीन आणि जुन्या लोकांचा समावेश असलेले पॅनेल असावे असा विचार करुन भागधारक पॅनेलची स्थापना करुन कामाला सुरुवात केली. बँकेत सत्ता आल्यानंतर त्यावेळेस श्री.चरेगावकर यांनी मार्गदर्शन केले आणि कामासंदर्भात सूचना केल्या त्यानुसार आम्ही काम करण्यास सुरुवात केली आणि तीन वर्षातच बँक तोटयातून बाहेर आली. लोकांनीही बँकेवर विश्वास दाखवला त्यामुळे गेल्या चार वर्षात 80 कोटी ठेवी वाटल्या असून कर्जवाटपही 60 कोटीने वाढले आहे. यावर्षी 8 टक्के लाभांश दिला असून राज्य कार्यक्षेत्र करण्यासाठी शाखा विस्तार, कोअर बँकिंग प्रणाली, ए.टी.एम., नेट बँकिंग, एनीवेअर बँकिंग  अशा सेवा सुरु करणार असल्याचे सांगितले. या यशात सेवकांच्या परिश्रमाचा वाटा असून संचालक मंडळाने राबवलेल्या धोरणाला त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. संचालक मंडळानेही त्याबदल्यात त्यांना मोबदला दिला असून 3 टक्के होणारी पगार कपात बंद केली. रजेचा पगार, बोनस सुरु केला. संचालक मंडळाने गेल्या चार वर्षात मिटिंगचा भत्ता घेतला नसून कोणतेही वेगळे खर्च केलेले नाहीत. भत्ता न घेणारे हे पहिले संचालक मंडळ आहे. या यशात सभासद, ठेवीदार, कर्जदाराचा वाटा असून बँकेचा सुवर्णकाळ पुन्हा सुरु झाला असल्याचे सांगितले.

त्यानंतर सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्याहस्ते आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना लाभांशाचा धनादेश देत प्रातिनिधीक स्वरुपात लाभांश वाटप सुरु करण्यात आले. यावेळी बँकेच्या ज्येष्ठ सभासदांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रास संचालिका डॉ.चेतना माजगावकर, संचालक जयेंद्र चव्हाण, प्रकाश बडेकर, माधव सारडा, आनंदराव कणसे, अरुण यादव, अमोल मोहिते, अतुल जाधव, जयवंत भोसले, शिरीष चिटणीस, अशोक मोने, चंद्रशेखर घोडके, तज्ञ संचालक धीरज कासट, ओंकार पोतदार, प्रभारी व्यवस्थापक विजयकुमार कोकीळ, बँकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि सातारा शहरातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बँकेचे अधिकारी आणि सेवक वर्गांने परिश्रम घेतले.

 

खासदार उदयनराजेंकडून लाभांशाचा धनादेश दुष्काळ निधीसाठी

कार्यक्रमास उपस्थित असलेल्या खासदार श्री.छ. उदयनराजे भोसले यांना सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्याहस्ते लाभांशाचा धनादेश देण्यात आला. हा धनादेश त्यांनी बँकेच्या व्हाईस चेअरमन सौ.सुजाता राजे’हाडिक यांच्याकडे देत तो दुष्काळ निधीसाठी द्यावा अशी सूचना केली. या कार्यक्रमास उपस्थित असलेले शहरातील सर्व जुने लोक पाहून मन भारावून गेले. जनता बँक म्हणजे एक कुटुंब असून बँकेला सभासदांनी कुटुंबासारखं जपलं, जतन केले आणि कुटुंब म्हणून राहिले याचा आनंद असून ते कायम ठेवत माझ्यावरही तुमचे असलेले प्रेम असेच कायम ठेवा अशी अपेक्षा व्यक्त केली.