53 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन विनोद कुलकर्णी यांची घोषणा

 

सातारा, दि.27 (प्रतिनिधी)- गेल्या बारा वर्षांपासून जनता सहकारी बँक अडचणीतून जात होती परंतु गत पंचवार्षिक निवडणुकीत आमच्या पॅनेलने बँक अडचणीतून बाहेर काढून लाभांश देणार असल्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे यावर्षी तब्बल 12 वर्षानंतर सभासदांना 8 टक्के लाभांश देणार असल्याची घोषणा जनता सहकारी बँकेचे चेअरमन विनोद कुलकर्णी यांनी केली. त्याचबरोबर बँकेचे राज्य कार्यक्षेत्र करणे आणि नवीन शाखा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

कोटेश्वर मैदानासमोर कला वाणिज्य कॉलेजच्या इमारतीमध्ये झालेल्या बँकेच्या 53 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी पॅनेलप्रमुख भास्करराव शालगर, रामचंद्र साठे, व्हाईस चेअरमन सौ.सुजाता राजेमहाडिक, संचालक मंडळातील संचालक, नगराध्यक्ष सचिन सारस, नगरसेवक अविनाश कदम, नगरसेविका स्मिता घोडके,  राजू गोडसे, नरेंद्र पाटील, अॅड. चंद्रकांत बेबले, अॅड. एस.आर. मुंढेकर, प्रवीण पाटील, फिरोज पठाण आणि सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.

श्री. कुलकर्णी पुढे म्हणाले, चार वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीच्यावेळी बँक कठीण परिस्थितीमध्ये होती.  रिझर्व्ह बँकेची बंधने होती. निवडणूकीवेळी बँक तोटयातून बाहेर काढून लाभांश देणार असल्याचे आमच्या पॅनेलने जाहीर केले होते. त्याप्रमाणे बँकेत पॅनेल आल्यानंतर गेल्या चार वर्षात सर्वच संचालक मंडळातील सदस्यांनी परिश्रमपूर्वक काम केले. बँकेच्या सर्वच चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांना संचालक मंडळातील संचालकांनी प्रोत्साहन दिले. त्यांनीही अधिकाराचा वापर करत बँकेची परिस्थिती सुदृढ केली. बँकेचा साडेतीन कोटी रुपयाचा तोटा भरुन काढला. यावर्षी बँकेला ऑडीट वर्ग अ मिळाला असून दीड कोटी रुपये नफा झाला आहे. त्यातून 8 टक्के लाभांश देण्यात येणार आहे. आमच्या संचालक मंडळाने चांगली कामगिरी केली असून नैतिक जबाबदारी पाळली आहे. बँकेला अच्छे दिन आणण्याचे काम केले आहे. याकाळात विरोधकांनीही विरोधासाठी विरोध ही भूमिका न ठेवता सत्ताधारी संचालक मंडळाला सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभारही त्यांनी मानले. बँकेला उर्जितावस्था प्राप्त झाली असून बँकेच्या शाखा विस्तार आणि राज्य कार्यक्षेत्र करणे त्याचबरोबर महाराष्ट्रात ठिकठिकाणी जनता सहकारी बँकेचे फलक दिसतील यासाठी प्रयत्न करु अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

सभेच्या प्रारंभी संचालक जयेंद्र चव्हाण यांनी मांडलेले मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, दि. 31 मार्च 2015 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षातील संचालक मंडळाने सादर केलेल्या ताळेबंद व नफातोटा पत्रकास मंजुरी देणे, सन 2014-15 अखेरच्या वैधानिक लेखापरीक्षकांच्या अहवालाची नोंद घेणे, वैधानिक लेखापरीक्षक यांनी 2013-14 सालाकरिता केलेल्या तपासणीवरील दोषदुरुस्ती अहलावाची नोंद घेणे, संचालक मंडळाने सुचविलेल्या 31 मार्च 2015 अखेरच्या नफा विभागणीस मंजुरी देणे, सन 2015-16 च्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे व सन 2014-15 च्या अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजुरी देणे, सन 2015-16 या आर्थिक वर्षासाठी वैधानिक लेखापरीक्षक यांची नेमणूक करणे व मेहनताना ठरविणे, सन 2016-17 सालासाठी अंतर्गत लेखापरीक्षक व कनकरंट ऑडिटर यांची नियुक्ती करणे व त्याचा मेहनताना ठरविणेबाबतचे अधिकार संचालक मंडळास देणे, बँकेच्या संचालक व नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाची नोंद घेणे, एकरकमी परतफेड योजनेतंर्गत बंद केलेल्या खात्यांची माहिती घेऊन त्यास मान्यता देणे, संचालक मंडळाने सुचविलेल्या पोटनियम दुरुस्तीस मंजुरी देणे, बँकेचा स्टाफिंग पॅटर्न मंजुर करणे व नोकर भरती करणेबाबत विचार विनिमय करुन निर्णय घेणे, बँकेच्या व्यवहारासाठी जरुरीप्रमाणे निधी उभारण्याचे अधिकार संचालक मंडळास देणे, 50 हजार रुपयेपर्यंतची जुनी एन.पी.ए. कर्जखाती निर्लेखित करणेबाबत विचार करणे, बँकेच्या शाखा विस्तार करणेबाबत विचार करणे, बँकेच्या स्व मालकीच्या इमारती घेणेस मंजुरी देणे, वार्षिक सर्वसाधारण सभेस हजर नसलेल्या सभासदांच्या अनुपस्थितीस मंजुरी देणे या सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.

सभेच्या सुरुवातीस गतवर्षात निधन झालेले बँकेचे सभासद, ठेवीदार, सातारा शहरातील मान्यवर व्यक्ती आणि माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. सभेचे प्रास्ताविक संचालक जयेंद्र चव्हाण यांनी केले. तर संचालक प्रकाश बडेकर यांनी सर्वांचे आभार मानत बँकेत नवनवीन सुविधा आणि चांगले काम करु अशी ग्वाही दिली.

या सर्वसाधारण सभेस संचालक जयेंद्र चव्हाण, माधव सारडा आनंदराव कणसे, अमोल मोहिते, जयवंतराव भोसले, अरुणकुमार यादव, शिरीष चिटणीस, प्रकाश बडेकर, अतुल जाधव, अशोक मोने, डॉ.चेतना माजगावकर, चंद्रशेखर घोडके, तज्ञ संचालक ओंकार पोतदार, धीरज कासट, सेवक प्रतिनिधी उमेश पाटील, प्रभारी व्यवस्थापक विजयकुमार कोकीळ, बँकेच्या विविध शाखांचे व्यवस्थापक, सेवक आणि सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.