देशाविषयी वाईट बोलणे म्हणजे स्वतःविषयी वाईट बोलणे आहे. अर्थक्रांती एकही भेद मानत नाही. मुजोर वृत्तीपासून सुटका आणि लाचारीमुक्त आयुष्यासाठी भारतात अर्थक्रांती आवश्यक असून नोटाबंदी हे त्यादृष्टीने टाकलेले एक पाऊल आहे. देशातील करव्यवस्थेत बदल होणे आवश्यक आहे. सद्य परिस्थितीत 2 टक्के प्रत्येक ट्रॅन्जेक्शन टॅक्स लावल्यास देशाचे उत्पन्न वाढून भारत विकसित देश होऊ शकते असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि अर्थक्रांतीचे संपादक यमाजी मालकर यांनी व्यक्त केले.

साता-यातील शाहू कलामंदिर येथे जायंटस ग्रुप ऑफ सातारा आयोजित जनता सहकारी बँक,सातारा व सप्तरंग कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने देशाला कलाटणी देणारी आणि देश-विदेशात चर्चा असणारी अर्थक्रांतीबाबत प्रथमच सातारकरांसाठी चर्चासञ आयोजित करण्यात आले होते.

यावेळी बोलताना श्री. मालकर पुढे म्हणाले,  अर्थक्रांती ही 130 कोटी भारतीयांसाठी काम करणारी संस्था आहे. भारतीयांना शांत, प्रामाणिकपणे जगता यावे यासाठी अर्थक्रांती प्रयत्नशील आहे. अर्थक्रांती हे देशातील आर्थिक प्रश्नांची मांडणी करते. पारदर्शी व्यवहार झाल्यास चांगल्या समाजाची निर्मिती होईल. कर भरणा प्रक्रियेमध्ये बदल करणे, फक्त आयात-निर्यात कर असावा, देशातील प्रत्येक शेवटच्या घटकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचली पाहिजे ही अर्थक्रांतीची संकल्पना आहे. पैसा महत्वाचा झाल्यामुळे एक समूह दुस-या समुहाला नावे ठेवू लागला. भेदभावमुक्त समाज निर्माण होण्यासाठी अर्थक्रांती महत्वाची आहे.

नोटाबंदी निर्णय हा स्वातंत्र्यानंतर देशात सर्वाधिक चर्चिला गेलेला विषय आहे. आणि संपूर्ण देश या निर्णयाच्या बाजूने सरकारच्या पाठीशी उभा राहिला. पूर्वी पैशांचे व्यवहार लपूनछपून चालत असत पण आता सर्व व्यवहार उघडउघड होत आहेत. नोटाबंदीचा निर्णय आता घेतला नसता तर देशात आर्थिक आणिबाणीची परिस्थिती निर्माण झाली असती. देशातील नागरिकांना राजकीय स्वातंत्र्याबरोबर आर्थिक स्वातंत्र्य मिळणे गरजेचे आहे. आर्थिक स्वातंत्र्य मिळाले तर देशातील लाचारी कमी होईल. ज्या देशात तरुणांची संख्या जास्त असते त्या देशाचे भवितव्य नेहमीच उज्ज्वल असते. आपल्या देशामध्ये 45 कोटी तरुण आहेत त्यामुळे सुदैवाने आपल्या देशाची प्रगतीच होणार आहे.

कुठल्याही आर्थिक निकषामध्ये भारत मागे नाही तरीदेखील भारतामधील चलन भारतातच का महाग झाले आहे. अनेक भारतीयांना अधिक व्याजदराने कर्जाच्या स्वरुपात महाग भारतीय चलन विकत घ्यावे लागते. घेतलेल्या कर्जावर अधिक रकमेने ते अदा करावे लागते. एवढी मोठी श्रीमंती आपल्या देशात असूनदेखील सार्वजनिक आयुष्य का गरीब होत चालले आहे.

सोन्याचा विचार केला असता भारतातील लोकांकडे 22 हजार टन सोने उपलब्ध आहे. तेल आयातीनंतर सर्वात जास्त सोने भारतात खरेदी केले जाते. सत्तेत कोणतेही सरकार असू दे सुरुवातीला अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत केला तर ती सरकारला  भारतीय लोकांना चांगले आयुष्य देता येईल. भारतीय माणूस चुकला नाही तर अर्थव्यवस्था चुकली आहे.

अमेरिका आणि जपाननंतर सुपर कॉम्प्युटर तयार करणारा देश भारत आहे. इतर प्रत्येक क्षेत्रात भारत पहिल्या दहामध्ये येतो. नैसर्गिक संपत्तीमध्येही भारत हा संपन्न देश आहे. तरीही आपला देश श्रीमंत आहे मात्र समृद्ध नाही. देशात कर भरणा-या नागरिकांची संख्या अतिशय कमी आहे. फक्त 15 टक्के नागरिक कर भरतात. त्यामुळे भारताला वारंवार दुसऱ्या देशाकडून कर्ज घेण्याची वेळ येते. आपल्या देशात व्याजदर आणि उत्पादन वस्तूंवरील कर जास्त असल्यामुळे आपण आंतरराष्ट्रीय बाजारात टिकाव धरू शकत नाही. १९४७ साली देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळाले. पण आर्थिक स्वातंत्र्य मिळाले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थक्रांतीचे पाच मुद्दे स्वीकारून नोटाबंदीचा निर्णय घेतला ही देशाच्या आर्थिक स्वातंत्र्याची सुरूवात आहे’, असे यमाजी मालकर यांनी सांगितले.

साखर, गहू, कोळसा, स्टील, पशुधन, दूध उत्पादन, दूरसंचार, चित्रपट निर्मिती, सुपर कम्प्युटर अशा अनेक क्षेत्रात भारत इतर देशांच्या तुलनेत आघाडीवर असून परदेशात नोकरीनिमित्ताने वास्तव्यास असलेली आपली मुले डॉलर देशात पाठवतात. मनुष्यबळ, पाणी, मुबलक सूर्यप्रकाश अशा नैसर्गिक संसाधनातही आपला देश समृद्ध आहे. पण काळ्या पैशांमुळे देश पोखरला गेला आहे. राजकारण काळ्या पैशावर चालते. श्वेत अर्थव्यवस्थेची वाढ फक्त सात टक्के असून ब्लॅक इकॉनॉमीची वाढ वीस टक्के आहे, असे ते म्हणाले.

पाचशे व हजार रुपये मूल्यांच्या नोटा अधिक आहे. परिणामी महागाई वाढत आहे. महागाई हा देखील एक प्रकारचा टॅक्स असून यामुळे सूज वाढली आहे. मोठ्या नोटा रद्द करणे हा त्यावरील एकमेव उपाय होता’ असे मालकर म्हणाले.

आपल्या देशात चांगल्या प्रकारचे बदल होणे शक्य नाही. याच विचारसरणीमुळे देश नकारात्मकतेत बुडाला. मात्र, ८ नोव्हेंबरला अतिशय गुप्तपणे घेण्यात आलेल्या निर्णयामुळे बदल घडण्याचा विश्‍वास निर्माण झाला. आपल्या देशातील लोकांनाच आपल्या देशाचे आकलन नसल्याने नोटाबंदी विरोधात चर्चा करण्यात आल्या. नोटाबंदी हा निर्णय अर्थक्रांती घडविणारा आहे. देशात मोठे चलन कायम ठेवले असते तर, काही काळाने चलन रद्द करण्याची परिस्थिती ओढावली असती. नोटांचे मूल्य वाढल्याने नोटांची छपाई वाढली. पर्यायाने महागाईत वाढ झाली. महागाई हा कर आहे. ती कमी करण्यासाठी मोठ्या नोटा रद्द करणे हाच एकमेव उपाय आहे. देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने हा उत्तम निर्णय आहे. हवा, पाणी, रक्त आणि पैसा हे प्रवाही असतील तरच शुद्ध असतात. भारताचे चलन मोठे आहे. मात्र, भारतातील ७० कोटी लोकांचे दररोजचे उत्पादन केवळ दोन डॉलर इतके आहे. भारतातील नोटांचे ८६ टक्के मूल्य हे ५०० आणि १००० च्या नोटांवर होते. पाचशे आणि हजाराच्या १७ लाख कोटी नोटा चलनात आहेत. तर १०० च्या केवळ ११ टक्के नोटा चलनात आहेत.
ज्या देशाचे लोक चांगले राहतात. त्याचा जीडीपी जास्त असतो. त्यावरून देश विकसित ठरविण्यात येतो. भारताचा जीडीपी १४ ते १६ टक्के आहे. भारतात अप्रत्यक्ष कर मोठ्या प्रमाणात आकारला जातो. हा कर नोटाबंदीमुळे कमी होण्याची शक्यता आहे. अर्थक्रांतीचा पाया हा बँकिंग आहे. त्यामुळेच शासनाने सुरुवातीला २५ कोटी बँक खाती काढली. आपल्याकडे भांडवल महाग असल्याने नवीन उद्योग उभारले जात नाही. आपला माणूस व्यवस्थेने नाही तर वृत्तीने अडला आहे. यावेळी अर्थक्रांतीसंबंधी चित्रफित दाखविण्यात आली. देशात काळ्या पैशांची निर्मिती कशी होते याचा नमूना यावेळी चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आला. शेवटी प्रश्नोत्तराचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये उपस्थित श्रोत्यांनी नोटाबंदी आणि सध्याची अर्थव्यवस्था यासंदर्भात प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना यमाजी मालकर यांनी उत्तरे दिली.

त्यापूर्वी चार्टर्ड अकौटंट प्रफुल्ल शहा यांचे कॅशलेस इकॉनॉमी या विषयावर मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी डिजीटल आणि ऑनलाईन बँकिंगविषयी दृष्टीकोन बदलून भीता घालवण्याचे आवाहन केले. जनता सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. चेतना माजगावकर यांनी जनता बँकेच्या प्रगतीचा आढावा घेत बँकेचीही वाटचाल कॅशलेस इकॉनॉमीकडे सुरु असून सातारकरांनी त्याला साथ द्यावी असे आवाहन केले. यावेळी संयोजकांच्यावतीने मान्यवरांचा आणि प्रायोजकांचा सत्कार करण्यात आला. चर्चासत्रास राजकीय, सामाजिक, बँकिंग, सहकार क्षेत्रातील मान्यवर आणि सातारकर मोठया संख्येने उपस्थित होते. चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी जायंटस ग्रुपचे पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले.