सहकारी संस्थांचा सर्वसामान्यांशी थेट संबंध येत असतो. या संस्थांच्या विश्वासपूर्ण कामगिरीमुळे नागरिकांचा बँकिंग क्षेत्रावरील विश्वास दृढ होतो. त्यामुळे ज्या सहकारी संस्था योग्य पध्दतीने चालतात आणि ग्राहकांना चांगली सेवा देतात त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळतो. सहा वर्षापूर्वी तोटयात असणारी जनता बँक आज नफ्यात आली असून लाभांशही देत आहेत. बदलत्या काळानुसार बँकेने आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारल्याने जनता बँकेची भविष्यात चौफेर प्रगती होईल असा विश्वास जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी व्यक्त केला.

जनता सहकारी बँकेच्या कोअर बँकिंग प्रणाली, डाटा सेंटर आणि एटीएम सेंटरचा शुभारंभ आणि एटीएम कार्डचे वितरणप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. व्यासपीठावर उपनिबंधक (सहकारी संस्था) संजयकुमार सुद्रिक, भागधारक पॅनेलप्रमुख बाळासाहेब जाजू, भास्करराव शालगर, अॅड. मुकुंद सारडा, विनोद कुलकर्णी, बँकेचे चेअरमन डॉ. चेतना माजगावकर, व्हाईस चेअरमन वजीर नदाफ, सर्व संचालक मंडळ, बँकेचे मुख्य व्यवस्थापक प्रशांत शास्त्री आणि मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, जनता सहकारी बँकेची दिवसेदिंवस प्रगतीकडे वाटचाल सुरु आहे. सहा वर्षापूर्वी तोटयात असलेली बँक आज नफ्यात असून गेल्या दोन वर्षांपासून लाभांशही दिला आहे याचा मला आनंद आहे. बदलत्या काळानुसार आर्थिक संस्थांमध्ये नवनवीन गोष्टी येत आहेत. त्याचा स्वीकार करुन ग्राहकांना चांगली सेवा देणे गरजेचे असून त्याचा सकारात्मक परिणाम बँकेच्या व्यवसायावर होत असता. जनता बँकेचे रुपे कार्ड हे मोठे पाऊल आहे.  चांगल्या सहकारी संस्थांमुळे लोकशाहीची व्यवस्था मजबूत होत असते आणि नागिरकांचा बँकिंग क्षेत्रावरील विश्वास वाढत असतो. आर्थिक संस्था योग्य पध्दतीने हताळण्याचे जनता सहकारी बँक उत्तम उदाहरण आहे. नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारल्याने बँकेचा नफा वाढण्यास मदत होणार असून बँकेने ते अंगीकारले आहे त्यामुळे बँकेचे भविष्यात चौफेर प्रगती होईल असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी बोलताना सहकारी संस्था उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक म्हणाले, जनता बँकेने सभासदांना घेऊन बँकेचा कारभार केला आहे. सहा वर्षांपूर्वी बँक अडचणीत आली त्यावेळेस 100 बँका अडचणीत होत्या परंतु जनता सहकारी बँक सर्वांच्या परिश्रमामुळे त्या संकटातून बाहेर पडली. 95 कोटीच्या ठेवी 200 कोटीवर गेल्या आहेत. कर्जदार, ठेवीदार, कर्मचारी, संचालक या चार स्तंभावर आर्थिक संस्था चालतात. जनता सहकारी बँकेचे हे चारही स्तंभ भक्कम आहेत. ग्राहक हा केंद्रबिंदू मानून तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे, कर्मचा-यांनी मानसिकतेत बदल करुन सेवा दिल्यास बँकेची अजून प्रगती होईल. पुढील काही वर्षात बँक 500 कोटी रुपयांचा टप्पा गाठेल आणि ग्रामीण भागातही बँक विविध सेवा उपलब्ध करुन देईल अशी आशा बाळगतो असे मत व्यक्त केले.

भागधारक पॅनेलचे प्रमुख अॅड. मुकुंद सारडा म्हणाले, संचालक, अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रयत्नातून बँक तोटयातून बाहेर आली. त्याचप्रमाणे सभासदांनीसुध्दा बँकेवर विश्वास दाखवला त्यामुळेच बँकेची आज प्रगतीकडे वाटचाल सुरु आहे. आधुनिक सेवा देण्याचा बँकेचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. संचालक मंडळाने यापूर्वी ज्याप्रमाणे काटकसरीने कारभार केला त्याचप्रमाणे केल्यास बँकेवर लाभांश देऊ शकत नाही अशी परिस्थिती येणार नाही. 55 वर्षाचा इतिहास असला तरी आता बँक बहरत चालली असून कर्मचा-यांनीही आपुलकीची भावना ठेऊन काम करावे असे आवाहन केले. यावेळी बोलताना भागधारक पॅनेलचे प्रमुख आणि संचालक विनोद कुलकर्णी म्हणाले, बँकेची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. मागील वर्षी जूनमध्ये झालेल्या निवडणुकीत भागधारक पॅनेलची 21-0 ने सत्ता आली त्यामुळे जबाबदारी वाढली होती. कमी वेळात अधिक काम करण्याच्या दृष्टीने संचालक मंडळाची वाटचाल सुरु आहे. त्यात अनेक अडथळे, नोटाबंदीचा परिणामही झाला परंतु कर्मचा-यांच्या प्रयत्नामुळे बँकेच्या कोणत्याही शाखेत रांगा लागल्या नाहीत. 9 वर्षानंतर कोअर बँकिंग प्रणाली पूर्ण झाली असून ती पूर्ण होण्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले. बँकेतीलच गुणवान कर्मचा-यांना बढती देण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न आहे. शाखा विस्तार, मोबाईल बँकिंग, नेट बॅकिंग सुरु करण्यात येणार असून सर्वांच्या सहकार्यामुळे आणि परिश्रमामुळे बँकेचे चौफेर प्रगती होईल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेच्या चेअरमन डॉ. चेतना माजगावकर यांनी केले. त्यात त्यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे लवकरच आणखी नवनवीन सुविधा सुरु करणार असून सर्वांचे परिश्रम आणि  ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच हे शक्य झाल्याचे सांगितले.

प्रारंभी कोअर बँकिंग प्रणाली, डाटा सेंटर आणि एटीएम सेंटरचा शुभारंभ जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. त्यानंतर मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी बँकेच्यावतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तर बँकेचे संचालक जयेंद्र चव्हाण, आनंदराव कणसे, अतुल जाधव, यशवंत कारंडे यांचा जिल्हाधिका-यांच्याहस्ते विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बँकेच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये क्रमांक मिळवलेल्यांचा सत्कारही मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला. त्यात बुध्दीबळ स्पर्धेतील विजेते राजेंद्र साळुंखे, उमेश साठे, रविंद्र राजेशिर्के, नोटा मोजणे स्पर्धेतील अनिल जठार, दिनेश बारटक्के, नाना बनसोडे, कॅरम स्पर्धेतील प्रदीप गोळविलकर, विक्रांत जोशी, राजेंद्र घोणे यांचा समावेश होता. त्यानंतर बँकेच्या विविध शाखांतील ग्राहकांना प्रातिनिधीक स्वरुपात मान्यवरांच्याहस्ते आणि संचालकांच्याहस्ते ए.टी.एम. कार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करुन देणा-या प्रफुल्ल नागोरी व त्यांच्या सहका-यांचा जिल्हाधिका-यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन राजेंद्र घोणे यांनी तर आभार मुख्य व्यवस्थापक प्रशांत शास्त्री यांनी मानले.

कार्यक्रमास संचालक अशोक मोने, जयवंत भोसले, जयेंद्र चव्हाण, आनंदराव कणसे, विनोद कुलकर्णी, अमोल मोहिते, माधव सारडा, अतुल जाधव, प्रा. अरुणकुमार यादव, निशांत पाटील, चंद्रशेखर घोडके, अविनाश बाचल, रवींद्र माने, रामचंद्र साठे, वसंत लेवे, नारायण लोहार, बाळासाहेब गोसावी, विजय बडेकर, संचालिका सौ. सुजाता राजेमहाडिक, तज्ज्ञ संचालक ओंकार पोतदार, धीरज कासट, निमंत्रित संचालक फिरोज पठाण, नितीन माने, सेवक संचालक राजू घोणे, बँकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेचे अधिकारी, कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.