सातारा, दि. 14-
सातारा शहर व तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या जनता सहकारी बँकेच्या चेअरमनपदी अतुल जाधव तर व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब गोसावी यांची एकमताने निवड करण्यात आली.

या निवडीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून सहकारी संस्था सहाय्यक निबंधक श्रीमती पी.के. काळे यांनी काम पाहिले.

सातारच्या जनता बँकेच्या इतिहासात अनेक वर्षे भागधारक पॅनेलची सत्ता होती व आहे. 2016 झालेल्या निवडणुकीत भागधारक पॅनेलने 21-0 असा विजय मिळवला. त्यानंतर पहिल्याच वर्षी जुन्या व जेष्ठ संचालिका श्रीमती चेतना माजगावकर यांना चेअरमन तर नवीन संचालक वजीर नदाफ यांना व्हाईस चेअरमन करण्यात आले. गेल्यावर्षी माधव सारडा यांना चेअरमन तर व्हाईस चेअरमन पद बँकेत प्रथमच निवडून आलेले अविनाश बाचल यांना एकमताने देण्यात आले. संचालक मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या सभेत बँकेत सात वर्षांपासून असणारे संचालक आणि प्रथितयश व्यावसायिक अतुल जाधव यांची चेअरमनपदी तर बाळासाहेब गोसावी यांची व्हाईस चेअरमनपदी एकमताने निवड करण्यात आली. श्री. जाधव यांनी यापूर्वी व्हाईस चेअरमनपद भूषवले आहे. ते सामाजिक क्षेत्राशीही संलग्ऩ आहेत. चेअरमन म्हणून निवडून दिल्याबद्दल संचालक सदस्यांचे श्री. जाधव यांनी आभार मानले. बँकेच्या प्रगतीच्या दृष्टीने कामकाज करुन बँकेच्या विश्वासात्मक व प्रगतीशील कार्यात सर्वांचा सहभाग रहील असा विश्वास व्यक्त केला. व्हाईस चेअरमन बाळासाहेब गोसावी यांनी बँकेच्या प्रगतीसाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्नशील राहू असे सांगितले.

निवडीनंतर अध्यासी अधिकारी यांच्याहस्ते नूतन पदाधिका-यांचा पुष्परोपे व शाल देऊन सत्कार करण्यात आला तर अध्यासी अधिकारी यांचा सत्कार डॉ. चेतना माजगावकर यांनी केला. माजी पदाधिका-यांचा सत्कार संचालक आनंदराव कणसे, अशोक मोने यांनी केला. यावेळी भागधारक पॅनेलप्रमुख व बँकेचे माजी चेअरमन विनोद कुलकर्णी, माधव सारडा यांनी मनोगत व्यक्त करुन नूतन पदाधिका-यांच्या कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या. सहाय्यक अधिकारी म्हणून दत्तात्रय मोहिते यांनी कामकाज पाहिले. याप्रसंगी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन अविनाश बाचल, संचालक जयेंद्र चव्हाण, अमोल मोहिते, जयवंतराव भोसले, चंद्रशेखर घोडके (सराफ), निशांत पाटील, वसंतराव लेवे, रामचंद्र साठे, रवींद्र माने, वजीर नदाफ, विजय बडेकर, नारायण लोहार, बँकेचे व्यवस्थापक प्रशांत शास्त्री, अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होता.