खुली अर्थव्यवस्था व जागतिकीकरणाचे धोरण स्वीकारल्यामुळे सहकारी बँकिग क्षेत्रातही अर्थकारणाचे बदल होत आहेत. हा बदल स्वीकारण्याची मानसिकता ठेवणे आवश्यक आहे. अलीकडे सहकारी बँका अडचणीत येत असताना समाजात खासगी सावकारीही सुरुच आहे. अनेक मोठया बँकांपेक्षा हजारो कोटी रुपयांच्या ठेवी सहकारी बँकात सुरक्षित आहेत. बँकिंग व्यवसाय हा नदीच्या पात्राप्रमाणे प्रवाही रहाणे आवश्यक आहे. अशा मनोठया अर्थकारण बदलाच्या काळातही व राज्यात अनेक बँका अस्थिर असताना जनता सहकारी बँक आजही खंबीरपणे उभी आहे, असे प्रतिपादन आमदार विलासराव पाटील- उंडाळकर यांनी केले.
येथील शाहू कलमंदिरात आयोजित जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, अर्थतज्ञ पी.एन.जोशी, नगराध्यक्षा सौ. मुक्ता लेवे, उपाध्यक्ष रवींद्र पवार, बँकेचे मार्गदर्शक अॅड. मुकुंद सारडा, बँकेचे अध्यक्ष प्रकाश गवळी, उपाध्यक्ष अमोल मोहिते, डॉ. चेतना माजगावकर, प्रकाश बडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
जागतिक सहकार वर्ष आपण साजरे करत असताना जनता सहकारी बँकेचा सुवर्णमहोत्सव साजरा करत आहोत. राजकारणाप्रमाणे अर्थकारणात रेटारेटी चालत नाही, असे स्पष्ट करुन आमदार उंडाळकर म्हणाले, विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपालिकेपेक्षा बँकिंग क्षेत्र वेगळे आहे. सहकारी बँकिंग क्षेत्राने ग्रामीण जीवनाशी नाते जोडले आहे. यशवंतराव चव्हाण यांनी साता-यातून या चळवळीला सुरुवात केली. ही चळवळ आता राज्यभर फोफावली आहे. साता-यात व्यापक दृष्टी असणा-या माणसांनी या बँकेची स्थापना केली. प्रकाश गवळी व त्यांच्या संचालक मंडळाने अडचणीतून ही बँक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. आता बँकेत लिगल सेक्शन निर्माण करुन काटेकोरपणे कर्ज वितरण करावेत. कारण आजचा कर्जदार खूपच हुशार आहे. एका घरावर पाच-पाच कर्जे ते काढू शकतात. बँकेचा कर्मचारी वर्गही तितकाच प्रशिक्षण पूर्ण आणि तत्पर असावा. बँकेच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीस मी शुभेच्छा देतो.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, जनता सहकारी बँक ही सातारकरांची बँक असून ती टिकली पाहिजे. या बँकेमागे अनेक थोरामोठयांचे सहकार्य लाभले असून ही बँक ही आपली संस्था असून 100 टक्के चांगलेच काम करते ही खात्री आहे व याच विश्वास, प्रेम, निष्ठेमुळे सभासद, हितचिंतक, कर्जदार व कर्मचा-यांच्या विश्वासाला पात्र राहून कामकाज केल्यास बँक अडचणीतून बाहेर येईल. आडनावानेच सावकर असलेले प्रकाशशेठ बँकेचे अध्यक्ष असल्याने बँक चांगल्याप्रकारे चालणारच असेही त्यांनी स्पष्ट केले.
पी.एन.जोशी म्हणाले, सहकारी चळवळीबाबत केंद्राचा दृष्टीकोनच समजून येत नाही. कर्नाटक, तमिळनाडू, आंधप्रदेश व महाराष्ट्रातच सहकार चळवळ आहे. उत्तर भारतात ही चळवळ कधीच संपली आहे. या चळवळीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणे आवश्यक आहे. पश्चिम महाराष्ट्रात लोकर एरिया बँक अशा येतील त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. जनता बँक प्रकाशाची वाट दाखवत सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. यावेळी मुकुंद सारडा यांनी संचालकांनी सभासदांसाठी नवनवीन योजना आणाव्यात व काटकसरीचे धोरण असेच यापुढेही सुरु ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
बँकेचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी प्रास्ताविकात बँकेच्या प्रगतीचा आढाव घेतला व सर्वांच्या शुभेच्छा व सहकार्यावर बँकेचा आलेख चढता राहील अशी ग्वाही दिली. यावेळी मान्यवरांच्याहस्ते बँकेच्या नवीन ठेव व कर्ज योजनांचा प्रारंभ करण्यात आला. तसेच शिवराज ससे, रुबीना शेख या खेळाडूंचा, सेवक संचालक राजाराम पवार तसेच व्यंकटेश दड्डीकर, विजय मराठे, सुरेश अग्रवाल या ज्येष्ठ ठेवीदार व सभासदांचा सत्कार करण्यात आले.
बँकेचे तज्ञ संचालक विनोद कुलकर्णी यांनी स्वागत केले. डॉ. चेतना माजगावकर यांनी आभार मानले. सौ. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी जयेंद्र चव्हाण, सुजाता राजेमहाडिक, रफिकभाई बागवान, राजन जोशी, दीपक पवार, चंद्रशेखर घोडके, प्रकाश बडेकर, अतुल जाधव, जयवंत भोसले, आनंदराव कणसे, बबनराव उथळे, अरुण गोडबोले, डॉ. अच्युत गोडबोले यांच्यासह बँकेचे सर्व संचालक, कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.